मुंबई राजमुद्रा दर्पण | योजना ही केंद्रातर्फे असो अथवा राज्यातर्फे असो नागरिकांच्या हितासाठी नागरिकांना त्या योजनेचा लाभ व्हावा यासाठी राज्य सरकार यांचे मोठे योगदान असते. योजनेची सर्व काम ही कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता पूर्ण केली पाहिजेत. मला आनंद व समाधान आहे की, या योजना राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरित्या पोहचविल्या असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
विविध केंद्रीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थीशी सहयाद्री अतिथीगृहातून संवाद साधतांना ते बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत ग्रामविकास विभागाने राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यानिमित्त मुख्यमंत्री बोलत होते.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रत्येक लाभार्थीशी संवाद साधून त्यांना योजनांचा लाभ कसा मिळाला तसेच त्यांच्या आणखी काही अपेक्षा आहेत का ते जाणून घेतले. ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.
यावेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी मुंबईमधील यासीन शब्बीर शेख, निशा शर्मा, कुंजू पवार या महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभाचे प्रमाणपत्रही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते देण्यात आला. केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये राज्याचाही 40 टक्के वाटा आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेने अगदी तालुका आणि गाव पातळीवर काम करून या योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहचविले आहेत आणि लाभार्थींच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहिले की हीच आपल्या आयुष्याची कमी वाटते. प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात ५,००,००० घरे ग्रामीण भागात बांधली असून यंदाही ५ लाख घरे बांधत आहोत. ३५०० कोटी रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध करून दिला आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की. २०२२-२३ मध्ये जल जीवन मिशनमध्ये १९ लाख कुटुंबास नळ जोडणी व पिण्याचे शुद्ध पाणीपुरवठा देण्यासाठी १९०० कोटी इतका निधी उपलब्ध करू दिला आहे.
याशिवाय पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना स्वच्छ भारत योजना (ग्रामीण व शहरी) इतर केंद्र शासन पुरस्कृत योजना राबविण्यात राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरीय यंत्रणाच्या सक्रीय सहभाग व नियोजनबद्ध अंमलबजावणीमुळे योजनांचा लाभ पोहचविणे शक्य झाले असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी साधलेल्या संवादात, नगर जिल्ह्यातील दरेवाडीचे मीरा कारंडे, लोणी बुद्रुकचे विनोद पारखे, चांदेगावचे सुखदेव उबाळे, कोल्हापूर जिल्ह्यातील हसुर दुमालाचे जिजाबाई पाटील, सांगरुळचे लक्ष्मी साठे, अर्जूनीचे नितीन आढाव, नाशिक जिल्ह्यातील कवनईचे आनंद पाटील, सटवाई वाडीचे नामदेव मेधाने, बागलाणचे मीरा पवार, नागपूर जिल्ह्यातील भंडारबोडीचे मीराबाई गणवीर, सुमन दोनारकर, खेर्डीचे संगीता निकम, औंरगाबाद जिल्ह्यातील रायपूर येथील बाळू राऊत, भराडीचे कृष्णा महाजन, फुलंब्रीचे सुवर्णा भुईगल या लाभार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले.