मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेला ई-मेलवरुन मुंबईवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेल करणाऱ्याने तालिबानचं नाव घेत धमकी दिली आहे. मुंबईसह इतर शहरांवरही हल्ला करणार असल्याचंही या मेलद्वारे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या असून, मुंबई पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ई-मेलवर धमकीचा मेल आला आहे. मेलमध्ये मुंबईवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. ईमेल करणाऱ्याने तालिबानी असल्याचा दावा केला आहे. तालिबानचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानीच्या आदेशानंतर मेल करण्यात आल्याचा दावा मेल करणाऱ्या व्यक्तीने केला आहे. यामुळे मुंबईसह देशातील इतर शहरात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोण आहे सिराजुद्दीन हक्कानी?
सिराजुद्दीन हक्कानी तालिबानच्या सर्वात धोकादायक गट हक्कानी नेटवर्कचा प्रमुख आहे. अफगाणिस्तानात तालिबानच्या सत्तेनंतर सिराजुद्दीन हक्कानीला गृहमंत्री करण्यात आले. हक्कानी तालिबानचा दुसऱ्या क्रमांकाचा प्रमुख नेता आहे. तालिबाननमध्ये हक्कानीचे नेटवर्क मजबूत आहे. अमेरिकेची एजन्सी एफबीआयने हक्कानीविषयी माहिती देणाऱ्याला 10 मिलिअन डॉलरचे बक्षीस ठेवले आहे.