नवी दिल्ली: आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानी जनतेला शाहबाज शरीफ सरकार रोज नवा धक्का देत आहे. पुन्हा एकदा विजेच्या दरात वाढ झाल्याने महागाईने होरपळणाऱ्या पाकिस्तानी जनतेवर संकट कोसळले आहे. शाहबाज शरीफ सरकारचा महागाईचा बॉम्ब त्यांच्यावर फुटेल आणि पाकिस्तानची संपूर्ण व्यवस्था कोलमडून पडेल असे दिवस आता पाकिस्तानातील जनता मोजत आहे. पाकिस्तानची परकीय चलनाची गंगाजळी अडीच अब्ज डॉलरपर्यंत घसरली आहे.
आर्थिक संकटावर मात करण्यासाठी पाकिस्तान सरकार आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडे लक्ष देत आहे. मात्र सध्या आयएमएफने एक अब्ज डॉलरचे कर्ज देण्यावर मौन बाळगले आहे.
पीठ आणि तांदळाचे भाव गगनाला भिडले
इकडे पाकिस्तानात शाहबाज सरकार अध्यादेश आणून आयएमएफच्या अटी मान्य करण्याचा दावा करत आहे. पण पाकिस्तानच्या पदरात अजून काहीही पडलेले नाही. मात्र लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. पिठापासून ते दूध, तांदळाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. पाकिस्तानमध्ये सध्या 120 रुपये किलो दराने पीठ विकले जात आहे. तांदूळ 200 रुपये किलो, दूध 150 रुपये लिटर, बटाटे 70 रुपये किलो, टोमॅटो 130 रुपये किलो आणि पेट्रोल 250 रुपये लिटर दराने विकले जात आहे.
चहापानही महागले
चहापत्तीच्या दरातही मोठी झेप घेतली आहे. गेल्या आठवडाभरात एक किलो चहापत्तीच्या दरात 500 रुपयांनी वाढ झाली आहे. पाकिस्तानमध्ये सामान्य चहापत्तीची किंमत 1600 रुपये प्रति किलो झाली आहे. पाकिस्तान सरकारची तिजोरी रिकामी असल्याने इतर देशांतून आयात केलेल्या चहापत्तीची खेप बंदरात अडकली आहे.
सर्वत्र संकटाची चाहूल
पाकिस्तानी चलन डॉलरच्या तुलनेत 275 पर्यंत घसरले आहे. ही सर्वकालीन निम्न पातळी आहे. खाण्यापिण्याच्या वस्तूंसह सर्व वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाई 27 टक्क्यांहून अधिक झाली आहे. पाकिस्तानमधील महागाईने 50 वर्षांचा उच्चांक गाठला आहे. परकीय चलनाचा साठा 1998 नंतरच्या नीचांकी पातळीवर आला आहे. आता फक्त 3 अब्ज डॉलर्स शिल्लक आहेत. त्यामुळे पाकिस्तान एक महिन्याची आयातही भरू शकणार नाही.