चोपडा (प्रतिनिधी) : दोन दिवसांपूर्वी चोपड्यातील अग्नितांडवात एकाचा मृत्यू झाला होता. यावेळी नगरपालिकेची कमकुवत व्यवस्था उघडी पडली होती. त्याच्याच विरोधात आज नागरिकांनी मूक मोर्चा काढून निषेध नोंदवला. या मूकमोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले. यावेळी नागरिकांनी नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा जाहीर निषेध केला.
चोपड्यातील मेन रोडवरील सुरेशचंद जैन यांच्या घरासह दुकानाला दोन दिवसापूर्वी भीषण आग लागली होती. जैन हे हे आपल्या तीन मजली घरात कुटुंबातील सात सदस्यांसह राहतात. या घराच्या खालच्या मजल्यात दुकान तर वरच्या दोन मजल्यांवर ते कुटुंबासह वास्तव्यास आहेत. जैन यांच्या घराला रात्री दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली.
आगीत होरपळून तरुणाचा मृत्यू
या आगीत सुरेशचंद जैन यांचा मुलगा आणि कुटुंबाचा आधारस्तंभ गौरव याचा गुदमरल्याने मृत्यू झाला.आग लागल्यानंतर गौरव हा आपल्या भावांचे प्राण वाचण्यासाठी तिसऱ्या मजल्यावर गेला. परंतु, आगीने रौद्ररूप धारण केल्याने तो तेथेच अडकला. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी गौरव तिसऱ्या मजल्यावरील शौचालयात बसून राहिला. शौचालयातच अडकल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला.
नगरपालिकेची यंत्रणा कमकुवत
आग लागल्यानंतर नगरपरिषदेकडून म्हणावी तशी मदत मिळाली नाही. या घटनेने एक प्रकारे नगरपरिषदेची कमकुवत व्यवस्था उघड्यावर पडली. त्याच्याच विरोधात नागरिकांच्या मनात असंतोष होता. त्यांनी आज रस्त्यावर उतरून मूक मोर्चा काढून व्यवस्थेचा निषेध नोंदवला. यावेळी मयत गौरव जैन यांच्या कुटुंबातील व्यक्तींना यावेळी अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले.