जळगाव : जामनेर तालुक्यातील मांडवे बुद्रूक येथे एका लग्न सोहळ्यातील आनंदावर विरजण पडलं आहे. लग्नाची तयारी सुरू असताना मुलीवर अक्षदा टाकण्यापूर्वीच वडिलांचे निधन झाले. हळदीच्या कार्यक्रमानंतर नाचत असताना हृदयविकाराच्या झटक्याने वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अरुण कासम तडवी (वय ५०, रा. तोंडापूर, ता. जामनेर) असं मृत पित्याचं नाव आहे.
जामनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथे अरुण कासम तडवी हे कुटुंबासह वास्तव्यास होते. मजुरी करुन ते कुटुंबांचा उदरनिर्वाह करत असत. तडवी यांच्या दुसऱ्या क्रमाकांची मुलगी हिना हिचा लग्न सोहळा सुरू होता. लग्नाची तयारी पूर्ण झाली होती. मोठ्या उत्साहात हा लग्नसोहळा पार पडत होता. तडवी परिवारात आनंदाचे वातावरण होते. हळदीचा कार्यक्रम पडला. हळदीच्या कार्यक्रमानंतर जळगाव जिल्ह्यात ग्रामीण भागात बीदचा कार्यक्रम होतो. हिना हिचाही बीदचा कार्यक्रम सुरु होता. या बीदच्या कार्यक्रमात नाचत असताना अरुण तडवी यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. तडवी यांना तातडीने तोंडापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तोपर्यंत अरुण तडवी यांची प्राणज्योल मालवली होती.
वडिलांच्या मृत्यूची बातमी लपवली
वडिलांच्या मृत्यूची बातमी हिनापासून लपवून ठेवण्यात आली होती. सकाळी ७ वाजेच्या सुमारास तिचं लग्न लागले. मात्र, वडिल दिसत नसल्याने हिना कासावीस झाली. अखेर तिला खरं काय ते सांगण्यात आले. बापाच्या मृत्यूची बातमी ऐकताच हिनाने हंबरडा फोडला. हिनाचा आक्रोश बघून लग्न सोहळ्याला उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले होते. ज्या ठिकाणी मुलीच्या लग्न सोहळा आटोपला, त्यानंतर काही तासातच त्याच ठिकाणी बापाची अंत्ययात्रा निघाली. या घटनेने सर्व गाव सुन्न झाले होते. मयत अरुण तडवी यांच्या पश्चात पत्नी , दोन मुली, दोन मुले असा परिवार आहे.