नवी दिल्ली : ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या (BBC) दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयात मंगळवारी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक दिली. आयकर विभागाकडून बीबीसीच्या कार्यालयात सर्व्हे केला जात असल्याची माहिती काल एएनआय वृत्तसंस्थेनं दिली. आता समोर आलेल्या माहितीनुसार आयकर विभागाचे अधिकारी अजूनही बीबीसीच्या कार्यालयात ठाण मांडून आहेत. गेल्या 19 तासांपासून अधिकारी कार्यालयाचा सर्व्हे करत आहेत.
इंटरनॅशनल टॅक्सच्या गैरप्रकारासंदर्भात बीबीसीच्या कार्यालयात आयकर अधिकारी चौकशी करत असल्याचं सांगितलं जात आहे. अधिकाऱ्यांनी बीबीसीच्या कार्यालयात धडक दिल्यानंतर कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाइल फोन जप्त केले आहेत. तसंच कर्मचाऱ्यांना ऑफीस सोडून घरी जाण्यास सांगितलं गेलं आहे.
कार्यालयातील व्हिडिओ आला समोर
बीबीसीच्या कार्यालयातील एक व्हिडिओ देखील आता समोर आला आहे. बीबीसीचा कर्मचारी आणि आयकर विभागाचा अधिकाऱ्यामध्ये वाद सुरू असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. सोशल मीडियात हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. आयकर विभागाचा अधिकारी ऑफीसचा एक्सेस मागत आहे, तर बीबीसीचा कर्मचारी अधिकाऱ्याकडे वॉरंटची मागणी करताना व्हिडिओत दिसून येत आहे. आयकर विभागाचा अधिकारी आपलं आयकार्ड दाखवून ओळख पटवून देताना यात दिसतो. तसंच सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचे फोन जमा करायला सांगत आहे. व्हिडिओत एक महिला कर्मचारीचा आवाज ऐकून येतोय जी आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला सभ्य भाषेत आणि न ओरडता बोलण्यास सांगत आहे.
एक्सेस देण्यास नकार
आयटी अधिकाऱ्यांनी बीबीसीच्या ऑफीसमधील कर्मचाऱ्यांच्या कॉम्प्यूटर आणि लॅपटॉपमध्ये ‘शेल कंपनी’, ‘फंड ट्रान्सफर’, ‘परदेशी ट्रान्सफर’ सहित सिस्टमवर चार किवर्डचा सर्च केला जात आहे. बीबीसीच्या संपादकांनी आयटी अधिकाऱ्यांना सांगितलं की ते आपल्या सिस्टममधील कोणतीही संपादकीय सामग्रीचा एक्सेस देऊ शकणार नाहीत.