मध्य प्रदेशातील कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सीहोर स्थित कुबेरेश्वर धाममधील रुद्राक्ष महोत्सवाच्या पहिल्या दिवशी गर्दीमुळे स्थिती नियंत्रणाबाहेर गेली. रुद्राक्ष घेण्याच्या नादात अक्षरशः चेंगराचेंगरीसारखी स्थिती उद्भवली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. तर 3 महिला बेपत्ता झाल्या.
महोत्सवाच्या ठिकाणी एवढी गर्दी आहे की पायी चालणेही अवघड झाले आहे. रुद्राक्ष न मिळालेले लोक पंडित मिश्रांविरोधात नारेबाजी करत आपल्यापावली माघारी जात आहेत. येथे जवळपास 10 लाख जण जमल्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही आपला येथील प्रस्तावित दौरा रद्द केला आहे.
मालेगाव येथील महिलेचा मृत्यू
मंडी ठाण्याचे ASI धर्मसिंह वर्मा यांनी सागितले की, मालेगाव येथील मंगला बाई (50) नामक महिलेची प्रकृती अचानक बिघडली होती. ती चक्कर येऊन खाली पडली. त्यातच तिचा मृत्यू झाला. तर महाराष्ट्रातीलच बुलढाण्याच्या एका महिलेसह 3 महिला भाविक बेपत्ता झाल्या आहेत.
पंडित प्रदीप मिश्रा म्हणाले – तिकीट रद्द करा
पंडित प्रदीप मिश्रा म्हणाले की, येथे रुद्राक्षाच्या लोभापायी कुणीही येऊ नये. तिकीट रद्द करा. येथे यायचे असेल तर महादेवांसाठी या. रुद्राक्षासाठी येण्याची काहीच गरज नाही.
15 हजार जणांकडे जबाबदारी
गुरुवारी सकाळची कुबेरेश्वर धाम ते इछावर रोडपर्यंत 7 किमी लांबीचा जाम होता. सीहोर ते इंदूरच्या दिशेने 17 किमी व भोपाळच्या दिशेने 10 किमी लांबीच्या महामार्गावरही जाम होता. गर्दीमुळे मोबाईल नेटवर्कवरही ताण आला होता. पोलिस व प्रशासनाच्या टीम व्यतिरिक्त आरएसएस, बजरंग दल, स्थानिक लोक, समिती सदस्य असे एकूण 15,000 लोक व्यवस्था सांभाळत आहेत. कथा पंडाल, अन्न पंडाल, रुद्राक्ष वितरण केंद्र येथे त्यांची ड्युटी लावण्यात आली आहे.