जळगाव: धरणगाव, चोपडा, पाचोरा, मुक्ताईनगर आणि एरंडोल या पाच ठिकाणी एमआयडीसी करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. जळगाव तालुक्यातील भोकर येथे तापी नदीवर दीडशे कोटीतून पुल व जोड रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी मंचावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भूसे, खा. रक्षा खडसे, आ. सुरेश भोळे, आ. चंद्रकांत पाटील, आ. लता सोनवणे आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, जळगाव जिल्ह्यास १०० नविन बसेस, जिल्ह्यातलं वारकरी भवन, हॉस्पिटलची उभारणी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यावल उपसा सिंचन योजनेसाठी ५९२ कोटी निधीचा विषय उपमुख्यमंत्री महोदयांकडे आहे. त्यांच्याशी भेटून हा विषय मार्गी लावणार आहे. निम्न तापी प्रकल्प ५४१ कोटीचा प्रकल्प आहे. त्याला शंभर कोटीच्या निधी मंजूर केला जाईल. या अर्थसंकल्पामध्ये त्याचा आपण समावेश करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
भोकर पुल दोन्ही जिल्ह्यांसाठी वरदान ठरणार
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, भोकर येथे दीडशे कोटीतून पुलाचे उद्घाटन करण्यात आले. या पुलामुळे जवळपास ७० किमी अंतर वाचणार आहे. हा पुल जळगाव आणि धुळे या दोन्ही जिल्ह्यांना वरदान ठरणार आहे. चोपडा मार्गे शिरपूरला जाणे सोपे होईल चोपडा, जळगाव आणि धरणगाव या तिन्ही तालुक्यातील जनतेला याचा लाभ होईल. येथील लोकांमध्ये कनेक्टिव्हिटी सोपी होईल.