मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार शिवसेना हे पक्षाचे नाव व धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा ताबा राहणार आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. यानंतरही उद्धव ठाकरे यांचे टेन्शन आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे गटाला बाळासाहेबांचे नाव आणि मशाल हे चिन्ह वापरण्यावरही निर्बंध येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील ‘बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष व त्यांचे ढाल- तलवार हे निवडणूक चिन्ह आयोगाने गोठविले आहे. त्याचबरोबर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा पक्ष व त्यांचे मशाल हे निवडणूक चिन्ह यांची मुदत केवळ चिंचवड पोटनिवडणुकीपर्यंत असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
ठाकरे गटाला 26 फेब्रुवारीपर्यंत मुदत
आयोगाने घटनेच्या 324 कलमांन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करत पक्षाचे नाव आणि चिन्ह यांचे वाटप केल्याचे म्हटले आहे. 26 फेब्रुवारीपर्यंतच हे चिन्ह आणि पक्षाचं नाव वापरण्याची मुदत आहे. त्यामुळे ठाकरे गटाला 26 फेब्रुवारीनंतर हे चिन्ह वापरता येणार नाही. तशी ऑर्डरच निवडणूक आयोगाने काढली आहे. निवडणुक आयोगाच्या या निर्णयानंतर आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
पक्षाची महत्वाची बैठक
उद्धव ठाकरेंनी आज पक्षाची महत्वाची बैठक बोलावली आहे. आज दुपारी एक वाजता मातोश्रीवर ही बैठक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता पुढची भूमिका काय असणार यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी मतदारसंघात असलेले आमदार आणि खासदार तत्काळ मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.
लोकशाहीच्या दृष्टीने घातक निर्णय
दरम्यान, निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय घातक निर्णय आहे. देशाचे स्वातंत्र्य संपले आहे, आता आम्ही बेबंदशाहीली सुरुवात केली आहे, असे पंतप्रधानांनी लाल किल्यावरुन जाहीर करावे. हा निर्णय अत्यंत अनपेक्षित आहे. चोरांना राज्यमान्यता देणे त्यांना भूषणाव वाटत असेल, पण चोर हा चोरच असतो. आज मिंध्ये गटाची आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाची दयनीय अवस्था झाली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.