जळगाव : राज्यात गाजलेल्या जळगावातील प्रा. व्ही.जी. पाटील खून खटल्यात मुख्य संशयित राजू सोनवणे याची औरंगाबाद हायकोर्टाने तब्बल 18 वर्षानंतर निर्दोष मुक्तता केली. या वृत्ताला जळगाव कोर्टात राजू सोनवणे यांचे वकील राहिलेले अॅड.एस.के.कौल यांनी दुजोरा दिला आहे.
काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रा. व्ही. जी. पाटील हे 21 सप्टेंबर 2005 रोजी नूतन मराठा महाविद्यालयात जात असताना मानराज पार्कजवळ त्यांची हत्या करण्यात आल्याने दोघांविरोधात जिल्हापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
आधी सुनावली जन्मठेपेची शिक्षा
पोलिसांनी 25 सप्टेंबर 2005 रोजी काँग्रेस कार्यकर्ता राजू माळी व त्याचा शालक राजू सोनवणे तर 6 नोव्हेंबर 2005 रोजी लिलाधर नारखेडे व दामू लोखंडे यांना अटक केली होती. कोर्टाने 3 फेब्रुवारी 2006 रोजी नारखेडे व लोखंडे यांना जामीन मंजूर केला होता. तर दुसरीकडे माळी व सोनवणे यांच्या विरोधात जळगाव कोर्टात खटला चालू असतांना 6 एप्रिल 2007 रोजी राजू माळी मयत झाला होता. त्यानंतर सोनवणे विरोधात खटला चालू ठेवण्यात आला होता. त्यानंतर नोव्हेंबर 2014 मध्ये राजू सोनवणे याला जळगाव कोर्टाने आरोपी राजू सोनवणे यास खून करणे व खुनाचा कट रचणे या आरोपांखाली दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
17 फेब्रुवारीला दिला निकाल
या प्रकरणी औरंगाबाद हायकोर्टात अनेक वर्षापासून सुनावणी सुरू होती. 17 फेब्रुवारी 2023 रोजी कोर्टाने राजू चिंतामण सोनवणे (माळी) याची निर्दोष मुक्तता केली, असे सोनवणे यांचे वकील अॅड.एस.के.कौल म्हणाले.