पुणे : निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांचा विजय झाला आहे. धनुष्यबाण ही निशाणी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाला मिळाली आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल म्हणजे उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का मानला जात आहे. धनुष्यबाणासह शिवसेना हे नावही एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर शिंदे-ठाकरे गटात जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे राहणार असल्याचा निर्णय दिला आहे. यामुळे शिंदे गटाने ठिकठिकाणी जल्लोष केला. आयोगाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्काच बसला आहे. आता माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकत्र येत आहेत. असे असताना पुण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाला आहे.
दोन्ही गटांकडून तुफान घोषणाबाजी
पुण्यात एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आले. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांसमोर तुफान घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी मध्यस्थी केली असून गोंधळ रोखण्याचे काम सुरू आहे. मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे पोलिसांसमोर गर्दी पांगवण्याचे मोठा आव्हान आहे.
दापोलीत शाखेवर शिंदे गटाचा ताबा
निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर दापोलीत तणावाचे वातावरण तयार झाले आहे. उद्धव ठाकरे गटाची शाखा शिंदे गट आणि समर्थकांनी ताब्यात घेतली. दापोली येथे आमदार योगेश कदम समर्थकांनी उद्धव ठाकरे गटाच्या शाखेत घुसून जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. शिवसेना पक्ष चिन्ह आम्हाला मिळाले आहे. त्यामुळे शिवसेना शाखा आमचीच आहे, असे म्हणत शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबादी करत राडा केला.