भुसावळ : भुसावळातील बँक ऑफ इंडिया शाखेतील सहाय्यक व्यवस्थापक योगेश प्रकाश भिलाणे याने बँकेला दोन कोटी रुपयांची चुना लावल्याची बाब उघडकीस आली होती. बँकेने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संशयीताला निलंबीत केले आहे.
जळगाव गुन्हे शाखेने संशयीताला भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. भुसावळातील बँक ऑफ इंडियात सहा व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या योगेश भिलाणे याने बँकेची तब्बल २ कोटी १ लाख २० हजार ९३४ रुपयांची फसवणूक केली होती.
पत्नीच्या खात्यात वळविला पैसा
संशयित आरोपी योगेश प्रकाश मिलाणे याने पत्नी तेजश्री भिलाणे (दोन्ही रा. देवराम नगर, कमला पार्क, जळगाव) हिच्या बँक खात्यात ११ जानेवारी २०२१ ते ३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत संगनमताने बनावट दस्तावेज तयार करून मयत इसमाच्या नावे असलेल्या बँक खात्याचा गैरवापर करीत बँक शाखेतील वेगवेगळ्या बँक खात्यातील जमा रकमा, एफडी व बँक खात्यातील जुन्या रकमा शाखा व्यवस्थापक यांच्या परवानगीविना वळत्या केल्या होत्या.
२० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी
शिवाय बँकेतील विड्रॉल स्लिपा, इतर दस्तावेज व बनावट तयार केलेल्या बँक खाते उघडण्याचा फॉर्म, केवायसीचे कागदपत्र गहाळ करून पुरावादेखील नष्ट केला. ठेवीदार ठेव रक्कम काढण्यास आल्यानंतर हा प्रकार उघडकीस येताच बँकेने भिलाणे यास निलंबीत करीत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. संशयीतास बुधवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास सोमवार, २० पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास आर्थिक गुन्हे शाखेचे उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर डेरे करीत आहेत.