मुंबई: निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. यामुळे राज्यातील सत्तासंघर्षाचा दुसरा अंक सुरु झाला आहे. राज्यभरातील शिवसेनेच्या शाखा ठाकरे गटाकडून शिंदे गटाने ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना ज्यांची त्यांचे शिवसेना भवन असणार आहे. कारण शिवसेना भवन हे शिवसेनेचे प्रतिक आणि नावावर आहे. ते पक्षाचे मुख्यालय आहे. यामुळे शिंदे गट शिवसेना, धनुष्यबाणानंतर आता शिवसेना भवनावरही दावा सांगणार असल्याची शक्यता आहे. याच दरम्यान संजय राऊतांनी गंभीर आरोप केला आहे.
“धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले” असं म्हणत हल्लाबोल केला आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील असं म्हणत इशारा देखील दिला आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “माझी खात्रीची माहिती आहे…. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत… हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे.. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील… देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते…” असं राऊत यांनी म्हटलं आहे.
सेना भवनावर दावा करणार नाही
शिंदे गटाने याबाबत खुलासा केला आहे. शिंदे गटाने आपण सेना भवन कधीही मागणार नाही, असा दावा केला आहे. आता ही भूमिका फक्त या नेत्याचीच आहे की शिंदेंची हे येणारा काळ ठरवेल. शिंदे गट शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. “शिवसेना भवन ही केवळ इमारत नाही, तर आमच्यासाठी मंदिर आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना भवनावर कधीही दावा करणार नाही. ठाकरे गटाच्या नेत्यांच्या मनातले विचार अत्यंत चुकीचे आहेत. जेव्हा-जेव्हा आम्ही शिवसेना भवनाजवळून जाऊ, तेव्हा तेव्हा शिवसेना भवनसमोर आम्ही नतमस्तक होऊ. आमच्या अनेक आठवणी शिवसेना भवनाशी जुळलेल्या आहेत. बाळासाहेबांबरोबर अनेक बैठका आमच्या त्या ठिकाणी झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही त्यावर कधीही दावा सांगणार नाही” असे संजय शिरसाट म्हणाले आहेत.