अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणातील आरोपीस पोलिसांनी अटक करून कारागृहात रवानगी केली होती. काही दिवसांपासून हा कैदी कारागृहात बंद होता, मात्र पोलीस कारागृहाची तपासणी करण्यास गेले असता, अचानक या कैद्याचे पोट दुखू लागले. वेदनाने हा कैदी तडफडू लागला. त्यावेळेस पोलिसांनी कैद्यास तात्काळ रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी एक्स-रे द्वारे तपासणी केली असता त्यांना मोठा धक्काच बसला.
डॉक्टरांना तपासणी करताना कैद्याच्या पोटामध्ये मोबाईल असल्याचे आढळून आले. ही बाब डॉक्टरांनी पोलिसांना सांगितली, यावेळी पोलिसांनी कैद्याची चौकशी केली असता, त्याने स्वतःच हा मोबाईल गिळल्याची माहिती दिली. पोलिसांच्या नजरेपासून लपून कारागृहातील कैदी मोबाईल फोन चालवत असतात. असाच एक प्रकार बिहारच्या गोपालगंज मंडल तुरुंगातून समोर आला आहे.
भीतीपोटी मोबाईलच गिळला
कैसर अली नामक कैदी अमली पदार्थ तस्करी प्रकरणात शिक्षा भोगत होता. कारागृहातही कैद्याकडे मोबाईल फोन होता. पोलीस याठिकाणी तपासणीला आले असता, भीतीपोटी त्याने घाईघाईने मोबाईल गिळला. काही वेळातच त्यांची प्रकृती खालावली. काही वेळातच त्यांच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. त्याने कारागृह प्रशासनाला पोटदुखीची माहिती दिली. घाईगडबडीत त्याला रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. रुग्णालयात एक्स-रे केला असता त्याच्या पोटात मोबाईल स्पष्ट दिसत होता. सध्या कैसर अलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.