नवी दिल्ली: एअर इंडियाचे अधिकार टाटा समूहाकडे आल्यापासून टाटा समूहाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. एअर इंडियाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी टाटा कटिबद्ध असल्याचे सांगितले जात आहे. याचाच एक भाग म्हणून टाटाने एअर इंडियासाठी विमाने खरेदी करण्याचा सर्वांत मोठा करार केला आहे.
टाटा समूहाची एअर इंडियाने फ्रान्सच्या एअरबस कंपनीकडून 250 विमाने खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. यामध्ये 40 वाइड बॉडी ए-350 विमाने आणि 210 नॅरो बॉडी विमानांचा समावेश आहे. ऑर्डर वाढवण्याचा पर्यायही करारात ठेवण्यात आला आहे, अशी माहिती टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे.
6.40 लाख कोटींचा करार
टाटा समूह एकूण 470 विमाने खरेदी करणार आहे. हा करार 80 अब्ज डॉलर्स म्हणजेच 6.40 लाख कोटी रुपयांचा असल्याचे सांगितले जात आहे. टाटा समूहाची कंपनी एअर इंडियामध्ये लवकरच मोठ्या प्रमाणात भरती मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे. कंपनीने अलीकडेच एअरबस आणि बोईंग यांना एकूण 470 विमानांच्या खरेदीचे करार केले असून, ताफ्यात भर पडणाऱ्या नवीन विमानांची ही संख्या पाहता कंपनीला 6500 हून अधिक वैमानिकांची नियुक्ती करावी लागणार आहे.
840 विमानांच्या खरेदीचे नियोजन
वैमानिकांव्यतिरिक्त विमानातील कर्मचारीवृंद आणि परिरक्षण दलातील कर्मचाऱ्यांची संख्या ही वैमानिकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल. एअर इंडियाच्या एअरबस आणि बोईंगशी झालेल्या करारांन्वये 470 विमानांची खरेदी केली जाणार आहे. याशिवाय या करारामध्ये आणखी 370 विमाने खरेदी करण्याचा पर्यायही ठेवला गेला आहे. त्यामुळे एकूण 840 विमानांच्या खरेदीचे एअर इंडियाचे नियोजन आहे, जे जगातील कोणत्याही विमानसेवेकडून आजवरची सर्वात मोठी विमान खरेदी ठरेल. एअर इंडियाने अधिक विमाने खरेदी करण्याचा पर्यायही वापरला तर कंपनीत नव्याने दाखल होणाऱ्या वैमानिक आणि कर्मचारीवृंदाची संख्या आणखी मोठी असेल.
तीन हजाराहून अधिक वैमानिक
एअर इंडियाच्या ताफ्यात सध्या 113 विमाने आहेत आणि सुमारे 1600 वैमानिक सेवेत आहेत. एअर इंडियाच्या दोन उपकंपन्या, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एअरएशिया इंडियाकडे एकूण 54 विमाने आहेत, ज्यांच्या उड्डाणासाठी त्या कंपन्यांच्या सेवेत जवळपास 850 वैमानिक आहेत. याशिवाय टाटा समूहाच्या संयुक्त भागीदारीत सुरू असलेल्या विस्ताराच्या ताफ्यातील 53 विमानांसाठी आणखी 600 वैमानिक आहेत. अशाप्रकारे, एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, विस्तारा आणि एअरएशिया इंडिया या टाटा समूहाच्या सर्व विमान कंपन्यांकडे मिळून एकूण 3000 हून अधिक वैमानिक कार्यरत आहेत.