मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षा आणि धनुष्यबाण चिन्हाचे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविले आहे. या निकालानंतर राज्यातील राजकारण धवळून निघाले आहे. खासदार संजय राऊत यांनी एक पत्र लिहून खळबळ उडवून दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी गुंडांना सुपारी दिल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी ठाणे पोलीस आयुक्त आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. राऊतांनी लिहिलेल्या पत्रात थेट श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामध्ये त्यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीला आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
काय म्हटलंय पत्रात?
“महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर लगेच माझी सुरक्षा हटवण्यात आली याबाबत मी आधीच आपणास कळवले आहे. या काळात सध्याच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि त्यांनी पोसलेल्या गुंड टोळ्यांकडून मला धमक्या देणारे प्रकार घडले. मी त्याबाबतही आपणास वेळोवेळी कळवले आहे. आजच माझ्याकडे पक्की माहिती आली आहे की, ठाण्यातील एक गुंड राजा ठाकूर यास माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली असून लवकरच तो माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मी संसद सदस्य, सामनाचा कार्यकारी संपादक आणि शिवसेना नेता असलो तरी एक जबाबदार नागरीक म्हणून ही माहिती तुम्हाला देत आहे”, असं संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.