मुंबई : राज्यभरात आजपासून बारावी बोर्डाची परीक्षा सुरु झाली. आज इंग्रजी विषयाचा पेपर घेण्यात आला. मात्र पहिल्याच पेपरमध्ये प्रश्नपत्रिकेत मोठी चूक झाल्याचं निदर्शनास आलं आहे. या प्रश्नपत्रिकेत एका प्रश्नऐवजी चक्क उत्तर छापून आल्याचं धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यावरून विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे बोर्डाने म्हटले आहे.
आजपासून राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यातून बारावीच्या परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले आहेत. संपूर्ण राज्यात 3195 केंद्रावर ही परीक्षा होत आहे. आज झालेल्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 3 च्या A3 to A5 या क्रमांकाच्या प्रश्नाऐवजी उत्तर छापलं गेलं. हे बघून विद्यार्थीही काहीसे चक्रावून गेले.
नेमका काय आहे प्रकार?
इंग्रजी पेपर मधील पान नंबर 10 मध्ये हा प्रकार पाहायला मिळाला.
– प्रश्न क्रमांक A 3 इंग्रजी कवितेववर आधारित असणे अपेक्षित होते पण याजागी तपासणाऱ्याला सूचना छापून आली होती.
– A 4 ला कवितेवर आधारित प्रश्न येणे अपेक्षित असताना त्याऐवजी उत्तरच छापण्यात आले आहे.
– A 5 हा प्रश्न देखील 2 गुणांचा होता. आणि येथे देखील प्रश्नाऐवजी तपासणाऱ्याला देण्यात येणाऱ्या सूचना छापण्यात आल्या आहेत.
या तिन्ही प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांनी नेमकं करायचं काय हा प्रश्न दिलेला नाही. तसेच हे तिन्ही प्रश्न प्रत्येकी 2 गुणांसाठी विचारण्यात आले होते.
त्यामुळे विद्यार्थी हा प्रश्न सोडवण्यासंदर्भात संभ्रमात होते.
बोर्डाने दिले स्पष्टीकरण
बोर्डाने प्रथमदर्शनी चूक मान्य केली आहे. पण नियामकाचा अहवाल आल्यानंतर ज्यांनी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला त्यांनाच ग्रेस मार्क देण्याचा निर्णय होईल, अशी माहिती देण्यास आली आहे. तसंच त्रुटींबाबत योग्य निर्णय जाहीर केला जाईल, असं स्पष्टीकरण बोर्डाने जाहीर केलं आहे. विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नाबाबत योग्य तो न्याय देण्यात येईल असं बोर्डाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हंटल आहे.