नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO ने होळीपूर्वी पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचारी पेन्शन योजना (EPS) अंतर्गत अधिक पेन्शनसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली. सेवानिवृत्ती निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेने सांगितले की, सदस्य आणि त्यांचे नियोक्ते यासाठी संयुक्तपणे अर्ज करू शकतील.
नोव्हेंबर 2022 मध्ये, सुप्रीम कोर्टाने कर्मचारी पेन्शन (सुधारणा) योजना, 2014 वर शिक्कामोर्तब केले. यापूर्वी, 22 ऑगस्ट 2014 च्या EPS दुरुस्तीने पेन्शनपात्र वेतन मर्यादा 6,500 रुपये प्रति महिना वरून 15,000 रुपये प्रति महिना केली होती. तसेच, सदस्य आणि त्यांच्या नियोक्त्यांना त्यांच्या वास्तविक पगाराच्या 8.33 टक्के EPS मध्ये योगदान देण्याची परवानगी होती.
URL सुविधा कार्यान्वित होणार
EPFO ने एका कार्यालयीन आदेशात त्यांच्या क्षेत्रीय कार्यालयांद्वारे संयुक्त पर्याय फॉर्म हाताळण्याबाबत तपशील दिला आहे. ईपीएफओने सांगितले की एक सुविधा दिली जाईल, ज्यासाठी URL (युनिक रिसोर्स लोकेशन) लवकरच सांगितले जाईल. हे मिळाल्यानंतर, प्रादेशिक पीएफ आयुक्त विस्तृत सार्वजनिक माहितीसाठी सूचना फलक आणि बॅनरद्वारे माहिती देतील. आदेशानुसार, प्रत्येक अर्जाची नोंदणी केली जाईल, डिजिटली लॉग इन केले जाईल आणि अर्जदाराला एक पावती क्रमांक दिला जाईल.
प्रकरणांची छाननी करुन मंजुरी मिळणार
त्यात पुढे म्हटले आहे की, संबंधित प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे प्रभारी अधिकारी उच्च वेतनावरील संयुक्त पर्यायाच्या प्रत्येक प्रकरणाची छाननी करतील. यानंतर अर्जदाराला ई-मेल/पोस्टद्वारे आणि नंतर एसएमएसद्वारे निर्णयाची माहिती दिली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या 4 नोव्हेंबर 2022 च्या आदेशाचे पालन करून या सूचना जारी करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.