पुणे : पुणे शिक्षण विभागात बोगस नोकरी घोटाळा उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे (रा.पाषाण) व त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. इंदापूर) यांचा समावेश आहे. नोकरीच्या आमिषाने लाखो रुपये घेऊन नोकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी दोघा बहीण भावांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात 44 जणांची फसवणूक केल्याचे चौकशीमध्ये समोर आले आहे. याबाबत पोपट सुखदेव सूर्यवंशी (रा. खाणजोडवाडी, आटपाडी, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे शिक्षक असून त्यांच्या नातेवाईक महिलेला शिक्षक पदावर नोकरी हवी होती. जून 2019 मध्ये दादासाहेब दराडे हे त्यांच्या संपर्कात आले त्याने शैलजा दराडे ह्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी असल्याचे सांगितले.
दोघांकडून घेतले 27 लाख रुपये
सूर्यवंशी यांच्या दोन नातेवाईक महिलांना शिक्षक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून हडपसर येथे 12 आणि 15 लाख असे 27 लाख रुपये घेतले. परंतु नोकरी न लावल्याने फिर्यादीने पैसे मागितले तरीही त्यांनी पैसे परत केले नाही त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अन्य 44 लोकांची देखील फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.