बोदवड (प्रतिनिधी) : बस मधून फुकट प्रवास करता यावा म्हणून एकाने गैरकृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कंडक्टरच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उजेडात आला. आपले बिंग फुटल्याचे पाहून प्रवाशाने वाद घालत वाद हाणामारीपर्यंत पोहचला. शेवटी बस पोलीस स्थानकाकडे वळविण्यात आली. आपण अडचणीत येऊ हे लक्षात येताच एकाने चालत्या बसमधून उडी मारून पळ काढला.
या संदर्भात अधिक असे की, जामनेर आगाराची बस (एमएच १४ बीआय १६४४) ही जामनेर ते बोदवड प्रवासासाठी निघाली. त्यात बोदवडपासून पाच ते सहा किमी अंतरावर ही बस येत असताना बसमधील एका प्रवाशाने आधार कार्ड दाखवून वाहकाला आपण ७५ वर्षांचा असल्याचे सांगितले. वाहक एकनाथ देवराम माळी (जामनेर) यांनी त्याच्याकडील आधार कार्ड आपल्याकडील यंत्राच्या साह्याने तपासले असता ते बनावट कार्ड असल्याचे उघड झाले.
वाहकाला दमदाटी करत मारहाण
वाहकाने ते कार्ड जप्त केले. त्यामुळे संतापून त्या प्रवाशाने व त्याच्या सहकाऱ्याने वाहकाला दमदाटी करत मारहाण करायला सुरुवात केली. हा प्रकार चालक संजय भगवान एगडे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी बस सरळ बोदवड पोलिस ठाण्याकडे वळवली. त्यावेळी मारहाण करणाऱ्या एकाने चालू बसमधून उडी मारत पळ काढल तर एकाला पोलिस ठाण्यात आणले.