यावल : यावल-भुसावळ रस्त्यावर भुसावळकडून यावलकडे दुचाकीद्वारे येत असलेल्या तरुणाला अंजाळे येथील पुलाजवळ अज्ञात चोरट्यांनी पिस्तूलचा धाक दाखवत त्याच्याकडील दुचाकीसह मोबाईल लांबवला. तरुणाने पोलिसांना माहिती देताच पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले व त्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
अजय रमाकांत मोरे (27, यावल) हा तरूण त्याच्या दुचाकीव्दारे भुसावळकडून यावलला येत असताना अंजाळे घाटाजवळ 24 ते 25 वर्षे वयोगटातील चार अज्ञात चोरट्यांनी मोरे यांची मोटरसायकल रोखत त्यांना पिस्टलाचा धाक दाखवून त्यास मारहाण केली व त्याची दुचाकी व मोबाईल घेऊन पळ काढला. घटनेचे वृत्त यावल पोलिसांना कळताच पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे, सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, हवलदार राजेंद्र पवार, सुशील घुगे, रवींद्र पाटील, भूषण चव्हाण, संदीप सूर्यवंशी,किशोर परदेशी घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांच्या पथकाने टाकरखेडा शिवारात सर्च मोहिम सुरू केली आहे.
बुलेट व एक्टिवा धारक चोरटे
तरूणाचा रस्ता अडवून रस्तालूट करणार्यांकडे बुलेट व एक्टिवा होती व दुचाकी वाहनाव्दारे भुसावळकडून पाठलाग करीत होते व अंजाळे पुलाजवळ प्रवाशी वर्दळ कमी आढळल्याने त्यांनी संधी साधली, असे अजय मोरे यांनी सांगितले.