मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. कांदा आणि कापूस प्रश्नावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे आज विधानभवनात पाहायला मिळाले. अधिवेशनात मविआच्या आमदारांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून पायऱ्यांवर उतरत जोरदार आंदोलन केले.
राज्यातील कांदा उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून न्याय मिळत नसल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. कांद्याची निर्यात वाढवण्याची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कांदा आणि कापसाच्या माळा घालून महाविकास आघाडीचे आमदार शेतकऱ्यांसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
निर्यातीवर कोणतीही बंदी नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देताना म्हणाले, शेतकऱ्यांचं हे सरकर आहे. म्हणून नियम डावलून भरपाई दिली आहे. नाफेडने खरेदी सुरु केली आहे ज्या ठिकाणी खरेदी सुरु केली नसेल त्या ठिकाणी देखील खरेदी सुरु करण्यात येणार आहे. तसेच निर्यातीवर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही, असे सांगितले.
…तर सरकारला कांद्यासारखं सोलून काढू
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी कांदा व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कांदा व कापसाचा प्रश्न मार्गी लावला नाही तर या सरकारला कांद्यासारखं सोलून काढू, असा इशारा दिला आहे.