जळगाव: गेल्या अनेक दिवसापासून जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बेकायदेशीररित्या मद्य, सट्टा वाढले आहे. मात्र याकडे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांचे दुर्लक्ष होत आहे. या सर्वांना जळगाव जिल्हा पोलिसांचे मोठ्या प्रमाणात अभय मिळत असल्याने तक्रारी करून देखील अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्या माफियांचे फावत आहे. त्यामुळे कारवाईची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी केली आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना अवैध धंद्यांचे व्हिडीओ दाखविले. निवेदनात म्हटले की, पोलिसांची मोठ्या प्रमाणात या भागातून हप्तेखोरी सुरू आहे. यामध्ये जिल्हा पोलीस दलातील एमआयडीसी पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांचा मुख्य सहभाग आहे. वरिष्ठांच्या डोळ्यात धूळफेक करत पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यानी संपूर्ण एमआयडीसी परिसरात माफिया राज सुरू केला आहे.
कर्मचाऱ्यांकडून हप्तेखोरी सुरु
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांची नियुक्तीच बेकायदेशीर असून यामुळे अनेक वाद जिल्हा पोलीस दलात निर्माण झाले आहे. त्यात पोलीस कर्मचारी असलेले जितेंद्र राजपूत बक्कल (नंबर 974) हुदा पोलीस हवालदार, रामकृष्ण पाटील बक्कल (नंबर 70) – पोलीस हवालदार या दोन कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हप्तेखोरी जमा केली जात आहे. या दरम्यान अनेक गंभीर खुनाच्या तसेच दरोड्याच्या घटना अवैध अवैध्य व्यवसायामुळे होत आहे.
व्यापाऱ्यामध्ये दहशतीचे वातावरण
अनेक गुन्हेगार या सर्व बेकायदेशीर कार्यात सक्रिय असून एमआयडीसी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्याकडून त्यांना अर्थपूर्ण लाभ मिळत असल्याने त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नसल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. यामुळे एमआयडीसी परिसरातील व्यापाऱ्यामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याऐवजी त्यांना कायदेशीर कचाट्यात ओढण्याचे काम एमआयडीसी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे हे करीत आहे.
कठोर कारवाईची मागणी
अनेक गोरगरीब महिलांना एमआयडीसी परिसरामध्ये लॉजिंग व्यवसायात गैरमार्गावर नेत शारीरिक शोषण देखील केले जात आहे. मात्र यामध्ये कारवाई करण्याऐवजी एमआयडीसी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी अर्थपूर्ण लाभ घेण्यावरच अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येत आहे. या सर्व प्रकरणाची दखल घेऊन पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व त्यांच्या गैरकारभारात सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी यांना पाठबळ दिल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.