मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मनसेचे नेते, माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांच्या शिवाजी पार्क येथे हल्ला झाला. दादर येथे अज्ञात लोकांनी प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्यांना तात्काळ हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे दादर येथील शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला गेले होते. यावेळी मॉर्निंग वॉक करत असतानाच अचानक काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोर चेहऱ्यावर मास्क लावू आले होते. हल्ला करून हल्लेखोर पसार झाले. त्यांना रॉड आणि स्टम्पने बेदम मारहाण करण्यात आली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संदीप देशपांडे प्रतिकार करू शकले नाही.
हिंदुजा रुग्णालयात दाखल
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे देशपांडे जखमी होऊन खाली कोसळले. देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शिवाजी पार्कात मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांनी देशपांडे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हल्लेखोर पसार झाले. त्यानंतर स्थानिकांनी तात्काळ देशपांडे यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देशपांडे यांची प्रकृती गंभीर नसल्याचं सांगितलं जात आहे. हल्लेखोर कोण होते, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. हल्लेखोरांच्या तोंडावर मास्क होते. त्यामुळे त्यांची ओळख पटू शकलेली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपासाला सुरुवात केली आहे.
मनसेचे कार्यकर्ते आक्रमक
या हल्ल्यानंतर दादरच्या शिवाजी पार्क परिसरात तणावाची स्थिती आहे. घटनेमुळे मनसेचे स्थानिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. हा राजकीय हल्ला आहे. संदीप देशपांडे मनसेची भूमिका मांडायचे. इतर पक्षांविरोधात भूमिका घ्यायचे त्यामुळे संदीप देशपांडे यांना गप्प करण्यासाठी हा हल्ला केला गेल्याचा आरोप कार्यकर्ते करत आहेत. अद्याप या हल्ल्यामागे कोण आहेत याची माहिती समोर आली नाही. हल्ल्यात संदीप देशपांडे यांना मार लागला आहे. परंतु ते सुखरुप आहेत. उपचारासाठी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केले आहे.