रावेर(प्रतिनिधी) : बालरोग तज्ञ डॉ प्रवीण चौधरी यांनी निर्मित केलेला उर्मी चित्रपट लवकरच पडद्यावर झळकणार आहे. नुकतेच व्हेलेंटाईन डे या दिवशी या चित्रपटाचे पोस्टर समी सोशल मिडीयावर लाँच करण्यात आले. आता चित्रपटाची प्रतीक्षा प्रेक्षकांना आहे.
उत्तम कथानक आणि दमदार स्टारकास्ट असलेल्या उर्मी या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर नुकतेच दि. १४ व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने लॉन्च करण्यात आले. १४ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या नावावरून हा चित्रपट महिला केंद्रित असल्याचं जाणवतं आहे. समृद्धी क्रिएशनच्या डॉ. प्रवीण दत्तात्रय चौधरी यांनी उर्मी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यांनीच चित्रपटासाठी कथा आणि गीतलेखनही केलं आहे. डॉ. चैताली प्रवीण चौधरी आणि मालतीबाई दत्तात्रय चौधरी यांनी चित्रपटाची सहनिर्माती केली आहे.
चित्रपटात हे आहेत कलाकार
राजेश बालकृष्ण जाधव यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनासह पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. विजय गटलेवार आणि उत्पल चौधरी यांनी संगीत दिले आहे. कौशल गोस्वामी यांनी छायांकन अनंत मारुती कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. महेश गोपाळ भारंबे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे. अभिनेता चिन्मय उदगीरकर, अभिनेत्री सायली संजीव, रसिका सुनील, नितीश चव्हाण आणि माधव अभ्यंकर अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. उर्मी या चित्रपटात दोन अभिनेत्रींची भूमिका आहे.