जळगाव : शहरातील स्टेट बँक कॉलनी परिसरात वीज चोरीची समस्या वाढली आहे. त्यामुळे नियमितपणे बील भरणाऱ्या ग्राहकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत तक्रार केली असता, महावितरणचे कर्मचारीच ग्राहकांना आकोडे टाकण्याचे उत्तर देतात. त्यामुळे वीज चोरीला महावितरण कर्मचाऱ्यांचाच वरदहस्त असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शहरात थकीत देयकाची वसुली करण्यासाठी महावितरणचे पथक वीजजोडण्या खंडित करीत आहे. दुसरीकडे परिसरातील अनेक ठिकाणी थेट मुख्य वाहिनीच्या तारांवर आकोडे टाकून वीजचोरी केली जात आहे. या प्रकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी महावितरणने कारवाई करणे गरजेचे आहे. तथापि, महावितरणचे पथक याकडे दुर्लक्ष करीत असून, महावितरणचे कर्मचारी उदासीन आहेत. या प्रकारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वीजचोरी करून महावितरणला लाखो रुपयांचा चुना लावत आहेत. या अजब प्रकारामुळे नागरिकांकडून महावितरणच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वीज चोरीकडे दुर्लक्ष
शहरातील स्टेट बँक कॉलनीतील एका नागरिकास वीज बिल भरण्यासाठी महावितरणतर्फे फोन आला. साधारणत: तीन महिन्याचे बील थकीत होते. यानंतर या ग्राहकाने वीज वितरणच्या कार्यालयात फोन केला. त्यांना व्होल्टेजची समस्या भेडसावत असते. याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्याकडे तक्रार केली. त्यांच्या परिसरातील पोलवर वीज चोरीसाठी आकोडे टाकण्यात आले आहेत. यामुळे वीज व्होल्टेजची समस्या निर्माण झाली आहे. ही बाब सांगितली असता, संबंधित कर्मचाऱ्याने स्टॅबिलायजर लावण्याचे सांगितले. मात्र आकोड्यांचा मुद्दा उपस्थित करताच, कर्मचाऱ्याने वीज मीटर जमा करुन तुम्हीही आकोडे टाका असा गजबचा सल्ला दिला. यामुळे संबंधित ग्राहक थक्कच झाला.
कारवाईची होतेय मागणी
वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या अशा हलगर्जीपणामुळेच वीज चोरीची समस्या वाढली आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी करुनही याकडे दुर्लक्ष केले जाते. वीज वितरणच्या कर्मचाऱ्याकडूनच आकोडे टाकण्याचा सल्ला देणे धक्कादायक आहे. याबाबत वरिष्ठांनी चौकशी करुन योग्य ती कारवाईची मागणी वीज ग्राहकांकडून केली जात आहे.