रत्नागिरी: शिवसेना नाव बाजुला काढा आणि तुमच्या आई-वडिलांचे नाव लावून पक्ष बांधून दाखवा. ज्यांनी बाळासाहेबांना जवळून पाहिलं नाही, तेदेखील आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवत आहेत. हे गद्दार तिकडे मुख्यमंत्री झाले अन् महाराष्ट्रातून उद्योगधंदे राज्याबाहेर गेले, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढविला.
निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत दिलेल्या मोठ्या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज खेडमध्ये पहिलीच सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे यांनी आता अमित शाह यांना वडील म्हटलंय, त्यामुळे ते आता आपली संपत्ती चोरणार का याची चिंता जय शाह यांना लागली आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
ते सगळे खोक्यात बंद झाले…
उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आजपर्यंत जे जे शक्य होईल ते त्यांना दिलं. तरीदेखील आज ते सगळे खोक्यात बंद झाले. आज माझे हात रिकामे आहेत, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. तरीदेखील तुम्ही आज माझ्यासोबत आला आहात. आज मी तुम्हाला मागायला आलोय. तुमचे आशीर्वाद अन् साथ पाहिजे. जे भुरटे, चोर, गद्दार, तोतया आहेत, ते शिवसेना नाव चोरू शकता, पण शिवेसेना नाही चोरू शकत. धनुष्यबाण चोरला असाल, पण तो तुम्हाला पेलवणार नाही. जिथे रावण उताणा पडला, तिथे हे मिंध्ये काय उभे राहणार, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली
हा तर चुना लगाव आयोग…
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, निवडणूक आयोगाच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल तर शिवसेना पाहायला यावं. हा चुना लगाव आयोग आहे. सत्येचे गुलाम आहेत. हे निवडणूक आयुक्त राहायच्या लायकीचे नाहीत. ज्या तत्वावर त्यांनी शिवसेना त्यांची सांगितली, ते तत्वचं मुळात खोटं आहे. शिवसेनेची स्थापना निवडणूक आयुक्ताच्या वडिलांनी नाही, माझ्या वडिलांनी केली. वरुन काय आदेश येईल त्याप्रमाणे वागणारे आहेत ते. या निवडणूक आयोगाचे वडील वरती बसले असतील पण शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांनी केलीय हे लक्षात ठेवा. निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही.
भाजपला गल्लीतला कुत्राही विचारत नव्हता
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘ज्यानी हिंदुत्वासाठी आयुष्य वेचलं, त्यांच्या विरोधातच तुम्ही गेलात. भाजपला गल्लीतला कुत्राही विचारत नव्हता, शिवसेना त्यांच्या मागे उभी राहिली. ज्यांनी साथ दिली, त्यांनाच तुम्ही संपवलं. हे पळून गेलेली ढेकणं आहेत, त्यांना चिरडायला तोफेची गोळीबाराची गरज नाही. ही ढेकणं आपलं रक्त पिऊन फुगले आहेत, त्यांना चिरडण्याची ताकत एका बोटात आहे.