नागपूर : प्रेमप्रकरणातून एक अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. गर्भवती असल्याची माहिती दडवून ठेवत मुलीने यू-ट्यूब पाहून स्वत:च प्रसूती करून बाळाला जन्म दिला. मात्र, या प्रकरणाची कुणालाही खबर लागू नये यासाठी मुलीनं स्वत:च्याच बाळाचा गळा दाबून हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. घटनेनंतर पोलिसांनी प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी नववीत शिकते. विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीनुसार, तिची वर्षभरापूर्वी ठाकूर नावाच्या युवकाशी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. ठाकूरने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यामुळे ती गर्भवती झाली. विद्यार्थिनीने ही बाब कोणालाही सांगितली नाही.
मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु
3 फेब्रुवारीला सकाळी आई ड्युटीवर गेल्यावर अल्पवयीन मुलीने यू-ट्यूब पाहून स्वत:च घरी प्रसूती केली. नवजात बाळाचा रडण्याचा आवाज आल्यास घर मालक आणि शेजाऱ्यांना माहिती होईल या भीतीने तिने नवजात बाळाचा गळा दाबला. सायंकाळी तिची आई घरी आल्यावर खोलीत रक्त पाहून घाबरली. यानंतर लागलीच मुलीला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर अल्पवयीन मुलीने स्वत: प्रसूती केल्याचे सांगितले. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल
डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली असता, पोलिसांनी केलेल्या चौकशीत मुलीने आपल्या कृत्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी नवजात बाळाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. त्याचा अहवाल यायचा असल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मुलीच्या माहितवरुन पोलिसांनी आता तिच्या प्रियकराविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.