जळगाव: जिल्ह्यातील अवैध धंद्यांचा मुद्दा तापला असून, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी थेट विधीमंडळ अधिवेशनात अवैध धंद्यांवरुन सरकारला धारेवर धरले. यानंतर जिल्ह्यात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. विशेष म्हणजे राजकीय नेत्याच्या जवळील कार्यकर्त्याच्या जुगार अड्यावर ही कारवाई झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाई पोलिसांनी तब्बल ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. रावेर तालुक्यातील मोरगाव येथील प्रल्हाद पुंडलीक पाटील यांचे घराच्या वॉल कंम्पाऊंडमध्ये प्रल्हाद पुंडलीक पाटील हा स्वतःच्या झन्ना मन्ना नावाचा पत्ता जुगाराचा खेळ खेळत खेळवित होता. याठिकाणी पोलिसांनी कारवाई करुन पत्ता जुगाराची साधने, रोख रुपये १ लाख ४६ हजार ९४०रुपये, ८ चारचाकी वाहने, ६ मोटारसायकल सह एकूण ५५ लाख ४६ हजार ९४० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
अधिवेशनात गाजले अवैध धंदे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात जळगाव जिल्ह्यातील अवैध धंदे विषयावरुन सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. जिल्ह्यातील सीमाभागात अवैध धंदे सुरु असून कारवाईची मागणी केली होती. यानंतर जिल्हा पोलिस दलाने अवैध धंद्यांविरुध्द मोहिम सुरु करुन कारवाई केली.
पोलिसांनी यांना केली अटक
आज (दि. ६) पहाटे ४.२० वाजताच्या सुमारास छापा टाकला. यावेळी जुगार अड्ड्डा मालक संदिप दिनकरराव देशमुख (वय ४८ रा. पुर्णाड ता. मुक्ताईनगर), संजय दर्शन गुप्ता (वय ५०, रा. लालबाग बऱ्हाणपुर (म.प्र.), शांताराम जिवराम मंगळकर (वय ४७, रा. लालबाग बऱ्हाणपुर (म.प्र.), समाधान काशिनाथ कोळी (वय ३०, रा.सांगवा ता. रावेर), कासम महेबुब तडवी (वय २८, रा. पिंप्री ता. रावेर), जितेंद्र सुभाष पाटील (वय ३५, रा. विवरा ता. रावेर), कैलास नारायण भोई (वय २३ रा. भोईवाडा, रावेर), मनोज दत्तु पाटील (वय ४८, रा. पिंप्रीनादु ता. मुक्ताईनगर), मनोज अनाराम सोळंखे (वय ३४ रा. आलमगंज बऱ्हाणपूर (म.प्र.), सुधिर गोपालदास तुलसानी (वय ४७, रा. इद्रनगर, बऱ्हाणपूर (म.प्र.), रविंद्र काशिनाथ महाजन (वय ५४ रा. वाघोदा ता. रावेर), बापु मका ठेलारी (वय ३१, रा. पुर्णाड ता. मुक्ताईनगर), राजु सुकदेव काळे (वय ५४ रा. प्रतापपुरा बन्हाणपूर (म.प्र.), युवराज चिंधु ठाकरे (वय ६५ रा. महालक्ष्मी मंदिरा जवळ रावेर), सोपान एकनाथ महाजन (वय ५९ रा. डापोरा अडगाव ता. ब-हाणपूर (म.प्र.), छोट्या (पूर्ण नाव माहित नाही), प्रल्हाद पुंडलीक पाटील रा. मोरगाव ता. रावेर (जागा मालक) यांना पोलिसांनी अटक केली.