मुंबई: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राज्यात मोठी कारवाई केली आहे. नागपुर आणि मुंबईसह ईडीने तब्बल 15 ठिकाणी छापेमारी केली आहे. या छापेमारीत कोट्यावधी रुपयांची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने मोठी कारवाई केली आहे. पंकज मेहाडिया, लोकेश आणि कथिक जैन यांच्या गुंतवणुकीच्या फसवणुकीसंदर्भात ईडीने नागपूर आणि मुंबईतील 15 ठिकाणी शोध मोहीम केली. यादरम्यान 5.51 कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि 1.21 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या छापेमारीत अनेक महत्वाची कागदपत्रेही ईडीने जप्त केल्याचं सांगण्यात येत आहे.
स्टील, रिअल इस्टेट व्यावसायिक रडारवर
नागपूरचे अनेक स्टील, लोह आणि रिअल इस्टेट व्यावसायिक ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकल्यानंतर त्यांची चौकशी आणि तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय अनेकांची फसवणूक करणाऱ्या पंकज मेहाडियाच्या घरावरही छापा टाकण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
पंकज मेहाडियाने 12 टक्के व्याजाचे आमिष दाखवून अनेक गुंतवणूकदरांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पंकजसह त्याची वृद्ध आई प्रेमलता नंदलाल मेहाडिया, लोकेश आणि कार्तिक जैन, बालमुकुंद लालचंद केयाल यांच्याविरोधात यापूर्वी गुन्हा दाखल केला आहे. 2021 मध्ये यांना अटकही करण्यात आली होती. यानंतर ईडीने पंकज मेहाडिया आणि त्याच्याशी संबंधित सुमारे 15 ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली आहे. या छापेमारीत आता मोठी रक्कम हाती लागल्याचं समोर आलं आहे.