नवी दिल्ली: पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदूंवर झालेल्या हल्ल्याच्या बातम्या सतत चर्चेत असतात. आता पुन्हा पाकिस्तानातून हिंदूंवर हल्ल्याच्या बातम्या येत आहेत. पाकिस्तानमध्ये होळी खेळण्यावरुन मोठा वाद झाला. येथे होळी साजरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होळी साजरी करण्यापासून रोखण्यात येऊन, त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. अल्पसंख्याक हिंदू समुदायातील किमान 15 विद्यार्थ्यांना पंजाब विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये कट्टरवादी कट्टर इस्लामिक विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी होळी साजरी करण्यापासून रोखले, यामध्ये 15 विद्यार्थी जखमी झाले.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, लाहोरमधील पंजाब विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये ही घटना घडली. जेव्हा सुमारे 30 हिंदू विद्यार्थी होळी साजरी करण्यासाठी जमले होते. विद्यापीठाचा विद्यार्थी आणि घटनेचा प्रत्यक्षदर्शी काशिफ ब्रोही म्हणाला, “विद्यार्थी लॉ कॉलेजच्या लॉनमध्ये जमले असताना, इस्लामिक जमियत तुलबा (IJT) च्या कार्यकर्त्यांनी त्यांना होळी साजरी करण्यापासून बळजबरीने रोखले, ज्यामुळे वादाची घटना घडली. चकमकीत 15 हिंदू विद्यार्थी जखमी झाले. ब्रोही यांनी होळी साजरी करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून परवानगी घेतल्याचा दावा केला.
विद्यापीठाच्या रक्षकांनीही मारहाण केली
होळी साजरी करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एक खेत कुमार, ज्यांच्या हाताला हाणामारीत दुखापत झाली. त्याने सांगितले की, आयजेटी सदस्यांनी केलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करत असताना विद्यापीठाच्या रक्षकांनी त्यांना मारहाण केली. कुमार पुढे म्हणाला, आम्ही आयजेटी आणि आम्हाला मारहाण आणि छळ करणाऱ्या सुरक्षा रक्षकांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली आहे. परंतु अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही.
विद्यापीठाने आदेशाकडे पाठ फिरवली
IJT (पंजाब विद्यापीठ) चे प्रवक्ते इब्राहिम शाहिद यांनी या घटनेत विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याचे नाकारले. ते म्हणाले, हिंदू विद्यार्थ्यांशी झालेल्या भांडणात सहभागी असलेला कोणताही विद्यार्थी आयजेटीचा नाही. पंजाब विद्यापीठाचे प्रवक्ते खुर्रम शहजाद म्हणाले की, विद्यापीठ प्रशासनाने लॉ कॉलेजच्या लॉनमध्ये होळी साजरी करण्यास परवानगी दिली नव्हती. जर समारंभ खोलीच्या आत आयोजित केला असता तर कोणतीही अडचण आली नसती. शहजाद पुढे म्हणाले की, कुलगुरूंनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.