नवी दिल्ली : नागालँडमध्ये भाजपसोबत युती करून NDPP पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे आणि सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी राज्यात विरोधकांशिवाय सरकार स्थापन होणार आहे. तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि जेडीयूसह सर्व राजकीय पक्ष भाजप आघाडीला बिनशर्त पाठिंबा देण्यास तयार आहेत.
नागालँड विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक संख्येने राजकीय पक्ष सहभागी होत असतानाही, नागालँडमधील नवीन सरकार विरोधक विरहित सरकारकडे वाटचाल करत आहे. यामध्ये जवळपास सर्वच पक्षांनी एनडीपीपी-भाजप युतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. एनडीपीपी आणि भाजपने 2 मार्च रोजी जाहीर झालेल्या निकालांमध्ये अनुक्रमे 25 आणि 12 जागा जिंकल्या आणि 60 सदस्यांच्या सभागृहात युतीची एकूण संख्या 37 झाली.
राष्ट्रवादीने केली घोषणा
तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सात आमदारांसह भाजप आघाडीत सामील होण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार वाय मोहनबेमो हमत्सो यांनी रविवारी पीटीआयला ही माहिती दिली. याशिवाय एनपीपीने पाच, एलजेपी (रामविलास), नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) आणि आरपीआय (आठवले) प्रत्येकी दोन, जद (यू) एक आणि अपक्ष चार जागा जिंकल्या आहेत. एनडीपीपी-भाजपने अद्याप सरकार स्थापनेचा दावा केला नसला तरी, त्यांना त्यांची दुसरी टर्म सुरू ठेवण्यासाठी इतर राजकीय पक्षांकडून बिनशर्त पाठिंबा मिळाला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होणार
राज्यातील इतर छोट्या पक्षांनी NDPP आणि भाजपासोबत सत्तेत जाण्यासाठी पाठिंबा दिला आहे. नागालँडचे राष्ट्रवादी प्रभारी नरेंद्र वर्मा याबाबत पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत त्यानंतरच यावर अंतिम निर्णय होऊ शकतो. नागालँडच्या स्थानिक राष्ट्रवादी नेत्यांचा कल सत्तेत सहभागी होण्याचा आहे. विरोधी पक्षात बसण्याऐवजी जर राष्ट्रवादीने भाजपासोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर त्याचे पडसाद महाराष्ट्रातील राजकारणावरही होतील. कारण राष्टवादीच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत संशयाचं वातावरण निर्माण होऊ शकते.