पुणे: तरुणींच्या साहाय्याने तरुणांना जाळ्यात ओढून त्यांची लुटमार करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीनं तरुणांना मारहाण करत नग्न फोटो काढून ते सोशल मीडियावर अपलोड करण्याचा धाक दाखवून 2 लाख रुपये खंडणीची देखील मागणी केली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून शिर्डीतून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक उर्फ लाया अर्जुन निळकंठ (वय 24, रा. छावा चौक कामशेत), रूपेश उर्फ कवठ्या विजय लालगुडे (वय 24, रा. कुसगांव खुर्द), सतीश कृष्णकुमार बिडलाम (वय 28, रा.कामशेत), रोहित गणेश चोपडे (वय 27, रा. कामशेत), साहील महादेव भिसे (वय 20,रा.चिंचवड) व महिला आरोपी (वय 20, रा. वडगाव मावळ) अशी अटक करण्यात आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बेडसे (ता.मावळ) येथील 24 वर्षीय युवकाने कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भेटायला बोलवून तरुणाचे अपहरण
बुधवार (दि. 1) रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास महिला आरोपीने बेडसे येथील 24 वर्षीय फिर्यादी व त्याचे मित्र यांच्या मोबाइलवर फोन करून त्यांना शिवशंकर मंगल कार्यालयाजवळ भेटण्यासाठी बोलाविले. त्यानुसार फिर्यादी व त्याचे चार मित्र हे त्या महिलेस भेटण्यासाठी गेले असता, त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या आरोपींनी फिर्यादी व त्यांचे साथीदारांना चामडी पट्टा, लाकडी दांडके व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी व त्याच्या मित्रांना पिस्तुलचा धाक दाखवून तुमच्याविरुद्ध बलात्काराची केस करतो अशी भीती घालून त्यांना गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले होते.