मुंबई : वाढत्या महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार उपाययोजनांवर भर देत आहे. तूर डाळीवरील आयात शुल्क समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खुल्या बाजारातील डाळीचे भाव कमी होतील. या निर्णयामुळे महागाई कमी होण्यास मदत मिळेल.
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार देशभरातील व्यापाऱ्यांना तूर डाळ आयात करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे आयात शुल्क भरावे लागणार नाही. परंतु, संपूर्ण तूर डाळ व्यतिरिक्त पूर्वीच्या तूर डाळीवर 10 टक्के मूळ आयात शुल्क लागू असेल. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मारक ठरण्याची शक्यता आहे. घरात साठा करुन ठेवलेल्या सोयाबीन, सूर्यफूल, कपाशी आणि इतर धान्यासोबतच डाळीवरही संक्रात येणार आहे.
स्वस्तात डाळी खरेदी करता येणार
मोदी सरकारने संपूर्ण तूर डाळीवर 10 टक्के आयात शुल्क लागू केले होते. आता हे शुल्क पूर्णपणे समाप्त करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने संपूर्ण तूर डाळीवरील आयात शुल्क हटविण्याचे आदेश लागू झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना स्वस्तात डाळी खरेदी करता येतील. डाळीचे भाव घसरल्याने महागाईचे चटके सहन करणाऱ्या जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.
दर नियंत्रणासाठी कठोर आदेश
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने तूर डाळसंबंधी कडक आदेश दिला होता. त्यानुसार, तूर डाळीच्या ट्रेडर्स, व्यापाऱ्यांना तिथल्या राज्य सरकारांना त्यांच्याकडील तूरडाळीच्या साठ्याविषयी माहिती देणे अनिवार्य करण्यात आले होते. अन्नधान्य महामंडळाच्या पोर्टलवर त्यांच्याकडील साठ्याची नियमीत माहिती अपडेट करणे त्यांना आवश्यक करण्यात आले होते. तसेच प्रत्येक राज्य सरकारने डाळींचा काळाबाजार थांबविण्यासाठी आणि किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी कठोर पाऊले टाकण्याचे निर्देश देण्यात आले होते.