चाळीसगाव (प्रतिनिधी): एका महिलेची हत्या करून गोणपाडात मृतदेह फेकण्यात आला. तालुक्यातील कन्नड महामार्ग क्र. 211 वरील घाटाच्या पायथ्याजवळ एका गोणपाटात मृत महिलेची फक्त हाडं मिळून आली आहेत. या प्रकारामुळे चाळीसगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव कन्नड महामार्ग क्र. 211 वरील घाटाच्या पायथ्याजवळ असलेल्या दर्ग्यापासून अंदाजे दोनशे मीटर अंतरावर पुर्व दिशेला बोढरे गावाच्या शिवारातील वन क्षेत्रातील झाडाझुडूपात एक गोणपाट आढळून आले संशयास्पद स्थितीत आढळलेल्या गोणपाट उघडून पाहिले असता यामध्ये मृतदेहाची हाडे मिळून आली आहेत.
खूनाचा गुन्हा दाखल
वन विभागाचे वनपाल दिपक किसन जाधव यांनी या घटनेप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात इसमाविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 12 मार्च 2023 च्या साधारण दोन ते तिन महिन्यापुर्वी हा गुन्हा घडल्याचा अंदाज आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव हे करीत आहेत.