बोदवड : बोदवड तालुक्यातील मनुर येथील लग्न समारंभासाठी पिंपळगाव बु. येथे आलेले तीघे तरुण दुचाकीवरुन वरणगावकडे येत असतांना एस. टी. बसने दिलेल्या धडकेत तीघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत वरणगाव पोलिसात एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोदवड तालुक्यातील मनुर गावातील रहिवासी मुरलीधर शेळके यांच्या मुलाचे तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील वासुदेव चौके यांच्या मुलीशी विवाह आयोजित करण्यात आला होता. यासाठी मनुर येथील वऱ्हाडी व मित्र पिंपळगाव येथे आले होते. त्या ठिकाणी लग्न लागण्यास वेळ असल्याने भागवत प्रल्हाद शेळके यांच्या ताब्यातील लाल रंगाची दुचाकी क्रमांक एम.एच. 19 सीएस 1198 हा चालवत असतांना व त्याच्या मागे बसलेले सचिन राजेंद शेळके (वय 26), जितेंद्र केलास चावरे (वय 32 सर्व रा मनुर) हे तिघ वरणगावला काही कारणानिमित्त जात होते.
वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल
पिंपळगाव सुसरी गावाच्या रस्त्याच्या मध्ये अशोक हरी पाटील यांच्या शेताजवळ एस.टी. बस क्र. एम.एच. 20 बी.एल. 0948 चे चालक दिलीप आप्पा तायडे यांच्या ताब्यातील एस. टी. बस भरधाव वेगात चालवुन नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या भागवत शेळके यांच्या ताब्यातील मोटार सायकलला जोरात धडक बसली. यात मोटार सायकल वरील भागवत शेळके यांच्या मानेमध्ये एसटीच्या उजव्या बाजूचा पत्रा गेला. तर सचिन शेळके यांच्या छातीला जबर मार लागल्याने तर जितेंद्र चावरे यांच्या डोक्याला व पायाला जबर मार लागल्याने या तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी सुसरी व पिंपळगावच्या नागरिकांनी मोटर सायकलवरील अपघातात मयत झालेल्या तिघांना अॅम्बुलन्समध्ये टाकुन वरणगाव ग्रामीण रुग्णालयात पोहचविले. त्या ठिकाणी वरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे मयुर चौधरी यांनी पोस्टमार्टम केले. यावेळी आ. चंद्रकांत पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली व नातेवाईकांसोबत चर्चा केली.