भुसावळ : शहरातील संत गाडगेबाबा महाविद्यालयाच्या पटांगणावर शतपावली करीत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला दोन तरुणांनी अडवत लुटल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शहर पोलिसात दोन अज्ञात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
रेल्वे कर्मचारी विकास कुमार शीतलाप्रसाद सरोज (वय 27, नॉर्थ कॉलनी, भुसावळ, मूळ रा.अमारी, ता.पट्टीप्रतापगढ) यांच्या तक्रारीनुसार रात्री 9.30 वाजता संत गाडगेबाबा महाविद्यालयाच्या पटांगणावर शतपावली करीत असताना 20 ते 22 वयोगटातील दोन अनोळखी तरुणांनी सरोज यांचा हात पकडला व खिशातील आठशे रुपये किंमतीचे हेडफोन, एक हजार आठशे रुपयांची रोकड व पॅनकार्ड असा एकूण दोन हजार 600 रुपयांचा मुद्देमाल घेवून पळ काढला. या प्रकरणी सरोज यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुपडा पाटील करीत आहेत.