मुंबई: हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून, बळीराजा चिंतेत सापडला आहे. सध्या गहू, हरभरा, कांदा काढणीचे दिवस आहेत. हवामान विभागाने 18 मार्चपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेषत: फळबागांचे मोठे नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 15 मार्च ते 18 मार्च या दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात पुणे, पिंपरी चिंचवड, सातारा, जळगाव, धुळे, वर्धा या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर ठाणे, अकोला जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास अवकाळी पाऊस बरसला. यवतमाळ जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. मुंबईतही पावसाने हजेरी लावली आहे.
‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील जवळपास 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट म्हणजेच मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत आज दिवसभरात मुसळधार पावसाची शक्यता असून गरज असेल तेव्हाच नागरिकांनी घराबाहेर पडावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
शुक्रवारी 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
उद्या शुक्रवारी 17 मार्चरोजी राज्यातील 9 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अहमदनगर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शनिवारी 18 मार्चपर्यंत राज्यातील ढगाळ वातावरण निवळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.