मुंबई : राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या कोणत्याही बसमध्ये 50 टक्के भाड्यात प्रवास करता येणार आहे. आजपासून ही योजना लागू करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली होती. त्यानुसार आज दिनांक 17 मार्च पासून योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणारं आहे. राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना 33 टक्के पासून 100 टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते.
प्रवासी संख्या वाढणार
सध्या दररोज सरासरी 5 लाखापेक्षा जास्त अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिक एसटीतून मोफत प्रवास करतात. दरमहा 65 ते 70 कोटी रुपये मिळतात. सध्या एसटीतून दररोज 50 ते 55 लाख प्रवासी प्रवास करतात आणि विविध योजनांमुळे महामंडळाला दिवसाला (प्रतिपूर्ती रक्कमेसह) 22 ते 24 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे. त्यातून अडचणीतील लालपरीचा प्रवास सुरू आहे. आता राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार परिपत्रक निघाल्यानंतर महिलांना प्रवास दरात 50 टक्क्यांची सवलत लागू होईल. त्याचाही मोठा आधार लालपरीला मिळणार आहे.