मुंबई: मोदी सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’चे लक्ष्य निर्धारित केले आहे. त्यामुळेच सध्या देशात अशी अनेक क्षेत्रे तयार होत आहेत, जी पूर्वी नव्हती आणि त्यामध्ये अनेक नोकऱ्याही निर्माण होत आहेत. असेच एक क्षेत्र आहे ते म्हणजे चिप किंवा सेमीकंडक्टर उत्पादन, सध्या भारतात या क्षेत्रात काम करणाऱ्या कुशल लोकांची कमतरता आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत अहवालानुसार, सध्या भारतात चिप मॅन्यूफॅक्चरिंग प्लांटमध्ये काम करणारी कुशल मनुष्यबळ नाही. एवढेच नाही तर 2027 पर्यंत या क्षेत्रात एक हजार किंवा दोन हजार नाही तर हजारो नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे शास्त्रज्ञ प्रशांत कुमार यांनी दिली.
10 ते 13 हजार नोकऱ्या उपलब्ध होतील
मंत्रालयाचे अधिकारी प्रशांत कुमार म्हणाले की, 2027 पर्यंत चिप उत्पादन क्षेत्रात 10 ते 13 हजार लोकांची गरज भासेल. म्हणजे इतक्या लोकांना रोजगार मिळेल. भारतामध्ये सेमीकंडक्टर्सची रचना करणाऱ्या अभियंत्यांची प्रचंड मागणी आहे, परंतु ही कामे हाताळणाऱ्या लोकांची संख्या नगण्य आहे. टाटा आणि वेदांत समूह भारतात सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यावर भर देत आहेत. दोन्ही गटांनी यासाठी परदेशी कंपन्यांशी भागीदारीही केली आहे.
प्लांट हाताळण्यापूर्वी लोक विदेशातून येतील
जेव्हा सेमीकंडक्टर प्लांट देशात सुरू होईल तेव्हा सुरुवातीला ते हाताळणारे लोक परदेशातून येतील. यानंतर कंपन्या स्थानिक लोकांना कौशल्य शिकवण्यास सुरुवात करतील आणि त्यांना कामावर ठेवतील. तरच 2027 पर्यंत अंदाजे 10 ते 13 हजार लोकांसाठी लागणारा टॅलेंट पूल तयार होईल. मंत्रालयाच्या अंतर्गत अहवालाच्या आधारे प्रशांत कुमार यांनी या सर्व गोष्टी सांगितल्या.
सरकारने ‘चिप्स टू स्टार्टअप’ कार्यक्रम सुरू केला
देशात 10 ते 13 हजार चिप प्लांट चालवणाऱ्या लोकांची गरज भासणार आहे. पण भारत सरकारने ‘चिप-टू-स्टार्टअप’ कार्यक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत 2027 पर्यंत 85,000 हून अधिक कुशल लोकांचा टॅलेंट पूल तयार करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी सरकारने देशातील 120 संस्थांना महागडी आणि आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स डिझाईन ऑटोमेशन टूल्स उपलब्ध करून दिली आहेत. ही साधने महाविद्यालये, स्टार्टअप्स आणि सरकारी संस्थांना देण्यात आली आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचा अनुभव देता येईल. ही साधने चिप डिझायनिंगच्या प्रशिक्षणासाठी उपयुक्त आहेत.