पुणे : पुण्यात एक मोठा घोटाळा उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. एका इन्व्हेस्टमेंट कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवत शेकडो जणांची तीनशे कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी ‘अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट’ या खासगी वित्तीय संस्थेच्या संचालकांसह कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन पुरुषोत्तम पवार (वय 38, रा. वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सेल्वाकुमार नडार (रा. कोंढवा खुर्द) याच्यासह साथीदारांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नडार आणि साथीदारांनी अष्टविनायक इन्व्हेस्टमेट नावाने खासगी वित्तीय संस्थेचे कार्यालय लष्कर भागातील न्यूक्लिअस मॉल परिसरात सुरू केले होते. अनेकांनी यात पैसे गुंतवले होते. मात्र आपली फसवणूक झाल्याचे समोर आल्यावर 16 जणांनी एकत्र येत पोलिसात धाव घेतली. प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केल्यानंतर एकूण 200 जणांची फसवणूक झाली असून ही रक्कम 300 कोटीच्या जवळपास आहे.
सहा बँकांमधून 47 लाखांचे कर्ज मंजूर
फिर्यादी सचिन पवार यांनी 2018 मध्ये 9.50 टक्के दराने सहा लाखांचे वाहन कर्ज आणि 13 टक्के दराने सहा लाखांचे वैयक्तिक कर्ज घेतले होते. त्याचे हफ्तेही ते नियमितपणे भरत होते. या दरम्यान त्यांना ‘अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट’मधील प्रतिनिधींचा फोन आला. सहा ते सात टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल किंवा सध्याच्या कर्जाचे हप्ते भरण्यात येतील, असे सांगण्यात आले. कंपनीने ऑगस्ट 2020 मध्ये पवार यांच्याकडून आवश्यक कागदपत्रांवर स्वाक्षरी घेऊन त्यांच्या नावे सहा वेगवेगळ्या बँकांतून 47 लाख 93 हजार रुपयांचे वैयक्तिक कर्ज मंजूर करून घेतले.
कर्जखाती बंद करण्यासाठी पुन्हा कर्ज
यातील 40 लाख 89 हजार रुपये ‘अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट’मध्ये ठेव स्वरूपात गुंतविले. त्यानंतर पवार यांच्या नावे कर्ज मंजूर केलेल्या सहा बँक खात्यांतील तीन कर्जखाती बंद करण्यासाठी पुन्हा एका फायनान्स कंपनीकडून 15 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले. जानेवारी 2023 पासून थकीत 33 लाख 85 हजारांवरील हप्ता भरण्यात आला नाही; तसेच SIP च्या नावाखाली पवार यांना 2 लाख 80 हजारांची रक्कम परत न देता एकूण 36 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक केली. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर तपास करीत आहेत.