जळगाव : केळी पिकावर फवारणी करताना विषारी औषध डोळ्यात व अंगावर पडल्याने जळगाव तालुक्यातील नंदगाव येथील महिलेला विषबाधा झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. जिजाबाई विश्वनाथ सोनवणे (वय ५५, रा.नंदगाव, जि.जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे.
जळगाव तालुक्यातील नंदगाव येथे जिजाबाई सोनवणे या शेती काम करून उदरनिर्वाह करीत होत्या. त्या नंदगाव शिवारातील शेतात केळीच्या पिकावर विषारी अळीनाशक औषधांची फवारणी करत असताना फवारणीचे औषध त्यांच्या डोळ्यात व अंगावर पडल्याने त्यांना विषबाधा झाली. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.