मुंबई : हवामानातील बदलामुळे H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूचे रुग्णही वाढत आहेत. महाराष्ट्र हे असे राज्य आहे जे सध्या दुहेरी संकटाला तोंड देत आहे. इथे H3N2 आणि कोरोनाने एकत्र हाहाकार माजवला आहे. राज्यात इन्फ्लूएंझामुळे आणखी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत अशा मृत्यूंची संख्या ही 7 पर्यंत पोहोचली आहे. तर कोविड-19 ने ठाण्यात एकाचा बळी घेतला.
राज्यातील आरोग्य विभागाच्या फ्लू अपडेटनुसार पुणे, वाशीम आणि खडकी कॅन्टोन्मेंटमध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत झालेल्या सात मृत्यूंपैकी तीन मृत्यू H1N1, तर एक H3N2 मुळे झाले आहेत. अहवालात म्हटले आहे की, या वर्षी आतापर्यंत 184 लोकांना H3N2 विषाणूची लागण झाली. तर 405 लोकांना स्वाइन फ्लूची लागण झाली. सध्या राज्यभरातील विविध रुग्णालयांमध्ये फ्लूचे 196 रुग्ण दाखल आहेत. राज्यात जानेवारीपासून आतापर्यंत इन्फ्लूएंझा-ए चे 3 लाखांहून अधिक संशयित रुग्ण आढळले आहेत.
इन्फ्लुएन्झाचे 567 रुग्ण
आतापर्यंत 184 जणांना H3N2 चा आणि 405 जणांना H1N1चा संसर्ग झाला आहे. तर फ्लूमुळे राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये 196 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. फ्लूची चाचणी अतिशय महागडी आहे आणि ती सर्वांनी करावी, असा सल्ला देणं योग्य नाही. जानेवारीपासून ते आतापर्यंत राज्यात 3 लाख इन्फ्लुएन्झा Aचे संशयित रुग्ण आढळल्याचं सांगण्यात येत आहे. फ्लूवरील उपचारासाठी oseltamivir हे औषध आतापर्यंत 1,634 संशयित रुग्णांना देण्यात आलं आहे.
कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ
कोरोनामुळे राज्यात आणखी एका मृत्यूची नोंद झाली आहे. शनिवारी ठाण्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर त्यापूर्वी शुक्रवारी कोल्हापूर कोरोनाने एका रुग्णाचे निधन झाले. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 249ने वाढली. शुक्रवारी 197 नवीन रुग्ण आढळले होते. मुंबईत शनिवारी करोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होऊन ती 71वर गेली आहे. राज्यात करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 1,164 इतकी झाली आहे. यात मुंबईतील 246 रुग्णांचा समावेश आहे.