रत्नागिरी : गद्दारी आम्ही केली नाही तर मुख्यमंत्री पदासाठी गद्दारी तुम्ही 2019 मध्ये केल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर केली आहे. ज्यावेळी बंडखोरी केली त्यावेळी बंडखोरी केली नसती तर तिच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांबरोबर बेईमानी ठरली असती, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी खेडच्या गोळीबार मैदानात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. त्याच मैदानात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ते लोक आज आपली सभा पाहत असतील. पूर्वी झालेल्या सभेची गर्दी आणि आजच्या सभेची गर्दी दिसत आहे. याच मैदानात बाळासाहेब ठाकरेंची सभा झाली होती. काही दिवसांपूर्वीच याच गोळीबार मैदानात फुसका बार येऊन गेला. मी त्यांना उत्तर द्यायला आलो नाही. तर कोकणातील शिवसैनिकांच्या प्रेमाखातर ही विराट सभा घेत असल्याचे सांगत त्यांनी रामदास कदम आणि योगेश कदम यांचाही यावेळी गौरव केला.
आदित्य ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सभेतून ठाकरे गटाबरोबरच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. यावेळी राहुल गांधी यांच्यावर त्यांनी निशाणा साधताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. त्यांच्यासोबत तुम्ही जाता, त्यांच्या गळ्यात गळा घालता असं म्हणत आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर टीका केली.
सत्तेसाठी ज्यांनी हिंदुत्व सोडलं
उद्धव ठाकरे यांनी गद्दारी, खोके यांच्याशिवाय त्यांच्याकडे बोलण्यासाठी आता दुसरे शब्दच नाहीत. तेही शब्द ते फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी करत असल्याचा घणाघातही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. सत्तेसाठी ज्यांनी हिंदुत्व सोडलं, त्यांच्याबद्दल काय बोलणार. काही लोकांना वाटत असेल, यांच्या सभेला एवढी गर्दी कशी झाली. कोकणी माणसाने बाळासाहेबांवर त्यांच्या विचारांवर प्रेम केलं. हेच प्रेम या सभेने दाखवून दिलं आहे. आम्हाला उत्तर देण्याची गरज नाही, याच सभेने त्यांना उत्तर दिलं आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीकडे शिवसेना गहाण ठेवली
सत्तेसाठी यांनी काय केलं, हे सगळ्यांना माहिती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे शिवसेना गहाण ठेवली. ज्या लोकांसोबत आम्ही निवडणूक लढवली, लोकांनी ज्या विचाराला मतदान केलं त्यांच्यासोबत गेलो. प्रत्येक पॅम्पेटवर बाळासाहेब आणि नरेंद्र मोदींचा फोटो होता. पण, मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी या विचाराशी गद्दारी केली. याविरोधात आम्ही भूमिका घेतली आणि गद्दारीचा डाग पुसण्याचे काम केले आहे. म्हणूनच निवडणूक आयोगाने आम्हाला शिवसेना आणि धनुष्यबाण दिला. बाळसाहेबांचा आशिर्वाद आपल्यासोबत आहे, म्हणून आपल्याला चिंता करण्याची गरज नाही, असेही शिंदे म्हणाले.