पहूर : नाशिक आयजींच्या विशेष पथकाने दिल्लीहून मुंबईकडे होणारी गुटख्याची तस्करी रोखत 60 लाख 80 हजार रुपये किंमतीचा गुटखा पहूरनजीक जप्त केल्याने गुटखा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पहूर पोलिसात कंटेनर चालकासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गुटखा तस्करी पुन्हा ऐरणीवर आला असून कारवाईत सातत्य राखण्याची मागणी होत आहे.
नाशिक येथील विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या पथकाने पहूर हद्दीतील सोनाळा फाट्याजवळ कंटेनर (एच.आर.47 डी.986) जप्त करीत त्यातून राज्यात प्रतिबंधीत विमल पानमसाला गुटखा जप्त करण्यात आला. कंटेनर चालक शराफत अली हसन महम्मद (30, चहलका, तहसील तावडू, जि.नुहू, हरीयाणा), वाहन मालक इम्रान खान शाहबुद्दीन खान (घसेरा, पलवल, हरीयाणा), मॅनेजर गोलु व गुटखा मालक राजु भाटिया (दिल्ली) ापूर्ण नाव, गाव माहिती नाही यांच्याविरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलिस निरीक्षक बापु रोहोम, ए.एस.आय रवींद्र ईश्वर शिलावट, बशीर गुलाब तडवी, पोलिस नाईक प्रमोद सोनु मंडलिक, मनोज अशोक दुसाने, चालक नारायण कचरू लोहरे यांनी केली.