चाळीसगाव – पोलीस स्टेशनला तक्रार का केली असे सांगत चापटाबु्क्यांनी मारहाण करत दोघांवर धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पेालीस स्टेशनला एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी प्रशांत तानाजी जाधव (वय 23) रा. आंबेडकर चौक हा सफाई कर्मचारी असून त्याच्यात व राहूल अण्णा जाधव याच्यात दि.9 रोजी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्याबाबत प्रशांत याने पोलिसात फिर्याद दिली. त्याचा राग येवून दि.16 रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास प्रशांत जाधव व त्याचा मित्र रामचंद्र अविनाश जाधव हे चौधरीवाड्याकडे जात होते. यावेळेस सदानंद स्टॉप येथे राहूल जाधव याने अडवून शिवीगाळ करीत माझे विरूद्ध पोलीसात तक्रार देतोस, तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी देत चापटा बु्क्यांनी मारहाण केली. तसेच त्याच्या हातातील तिक्ष्ण हत्याराने मानेवर वार केला.
जखमींवर रुग्णालयात उपचार
प्रशांत याला वाचवण्यासाठी रामचंद्र जाधव हा धावला असता त्याच्या गळ्यावर वार केला. राहूल याच्या तावडीतून सुटका करून घेत दोघेजण खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. याप्रकरणी प्रशांत जाधव याने दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला संशयित राहूल अण्णा जाधव याचे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.