धुळे : तालुक्यातील निमडाळे शिवारात सहाय्यक पोलीस अधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी यांच्यासह पथकाने गुटख्याची तस्करी रोखली. सापळा लावून दोन ट्रकला पकडण्यात आले. त्यातून सव्वा कोटींचा गुटखा जप्त करण्यात आला तसेच सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री 12:30 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
पश्चिम देवपुर पोलीस स्टेशन हद्दीतील निमडाळे गाव शिवारातून धुळे शहरात महाराष्ट्रात प्रतिबंधित विमल पानमसाला गुटखा मालविक्री करण्याच्या उद्देशाने दोन आयशर (क्रं. एम. एच ०४/एफ जे ३०४८) व (क्रं एम. एच ०४ / एच. डी. ७३५०) या येणार असल्याची गोपनीय बातमी धुळे शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक एस. ऋषीकेश रेड्डी यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने निमडाळे गाव शिवारात सापळा लावला.
यांच्या पथकाने केली कारवाई
रात्री 12.30 वाजेच्या सुमारास वरील क्रमांकाच्या दोन्ही आयशर वाहन आल्याने त्यांना थांबवून त्यांची
तपासणी केली. त्यात एकूण 1 कोटी 23 लाख रुपये किंमतीचा विमल पानमसाला गुटखा, सुगंधित तंबाखूचा माल मिळून आला. तसेच सात संशयित इसमांना ताब्यात घेण्यात आले. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागांकडून सविस्तर पंचनामा करुन पश्चीम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक एस ऋषीकेश रेड्डी, पोसई दत्तात्रय उजे, हेकॉ, कबीर शेख, चंद्रकांत जोशी, रमेश उघडे, मंगा शेमले, पोकॉ प्रशांत पाटील, चंद्रकांत पाटील, कर्नलबापु चौरे, शरद पाटील यांनी केली आहे.