चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे हनुमानवाडी भागातील तीन अल्पवयीन तरुणांकडून दोन गावठी कट्टे व दहा जिवंत काडतूस जप्त केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास करण्यात आली.
चाळीसगाव शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे हनुमानवाडी भागातील तीन अल्पवयीन तरुणांकडून दोन गावठी कट्टे व दहा जिवंत काडतूस जप्त केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अवघ्या 15 ते 16 वयोगटातील अल्पवयीन तरुणांकडे गावठी कट्टे आले कुठून ? व ते कशासाठी याचा वापर करणार होते? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ताब्यातील दोघे अल्पवयीन भावंडे माजी नगरसेवक पूत्र असून या कारवाईने राजकीय वर्तुळातदेखील मोठी खळबळ उडाली आहे.
69 हजारांचा शस्त्रसाठा जप्त
हनुमानवाडी भागातील घरासमोरील हनुमान मंदिराजवळून दोघा अल्पवयीन भावंडासह आणखी एका अल्पवयीन तरुणाला मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले. संशयीताच्या ताब्यातून दोन गावठी कट्टे, दोन मॅग्झीन तसेच दहा जिवंत काडतूस असा एकूण 69 हजारांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी नाईक दीपक प्रभाकर पाटील यांच्या फिर्यादीनुसार तिघा अल्पवयीन संशयीतांविरोधात शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक सुहास आव्हाड करीत आहेत.