मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल, याचा कधीच अंदाज बांधता येणार नाही. राज्यात नऊ महिन्यांपूर्वी सत्तांतर घडून आलं. या घडामोडींनंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील राजकारण अक्षरश: ढवळून निघालं. या सगळ्या घडामोडींदरम्यान आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी आणि आश्चर्यकारक घटना घडली. कारण उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज अनेक महिन्यांनी भेट झाली.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. या भेटीत भाजप आणि ठाकरे गटाची आगामी काळातील काही राजकीय रणनीती ठरली की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. या दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली.
कटुता संपवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत
“याचा अर्थ असा आहे की, उद्धव ठाकरेंनी वारंवार विधानसभेत जायला हवं. म्हणजे एकत्र भेटतील, बोलतील, चर्चा करतील. महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. विरोध राजकीय असतो, व्यक्तीगत नसतो. मी मागेही म्हणालो, कटुता संपवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. निवडणुकीत तुमचा पराभव करु. विचारांची लढाई विचारांनी करु. पण सुडाने, बदल्याच्या भावनेने कारवाई करणार असाल आणि तशी भाषा करणार असाल तर मग आम्हाला तशाच भाषेत उत्तर द्यावं लागेल. महाराष्ट्र हे एक संस्कारी राजकारण करणारं राज्य आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
ठाकरे-फडणवीस यांनी भेटून का बोलू नये?
“उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भेटून का बोलू नये? त्यांच्या भेटीमागे काही राजकीय संकेत आहेत, असं मला वाटत नाही. मी एवढा भोळा आशावादी नाही. ज्या पद्धतीचं राजकारण आमच्यासोबत गेल्या काही महिन्यात घडलं. ज्या जखमा आहेत त्या कधी भरुन काढता येणार नाहीत”, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.