आग्रा : पाळीव प्राणी-पक्षीदेखील आपल्या घरातील एक प्रकारचे सदस्यच असतात. त्यांच्यावर आपण जितके प्रेम करतो त्याहून अधिक ते आपल्याला संकट काळात मदत करतात. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे नऊ वर्षांपूर्वी झालेल्या एका खुनाच्या खटल्यात पोपटाच्या साक्षीवरुन आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. या पोपटामुळं महिलेच्या हत्येचं रहस्य उघड झाले असून, कोर्टाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
आग्रा येथे नऊ वर्षांपूर्वी नीलम शर्मा नावाच्या महिलेची हत्या झाली होती. त्या प्रकरणात पोपटाच्या साक्षीवरुन न्यायालयाने आता मृत महिलेचा भाचा आशुतोष गोस्वामी आणि त्याचा मित्र रॉनी मॅसी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गुन्हेगारांनी महिलेच्या पाळीव कुत्र्यालाही मारले होते. विशेष बाब म्हणजे कुत्र्याच्या हल्ल्यातील जखमेच्या खुणा आणि पोपटाची साक्ष पोलिसांना मारेकऱ्यांपर्यंत घेऊन गेली.
महिलेसह कुत्र्याची हत्या
नीलम शर्मा आपल्या कुटुंबासोबत आग्रा येथे राहत होत्या. 20 फेब्रुवारी 2014 रोजी नीलम यांचे पती विजय शर्मा, त्यांची मुलगी आणि मुलगा फिरोजाबाद येथे लग्नासाठी गेले होते. नीलम घरी एकट्याच होत्या. त्यांच्यासोबत घरात पाळीव कुत्रा आणि पोपट होते. कुटुंबीय घरी परतले तेव्हा त्यांना नीलम आणि पाळीव कुत्रा जॅकी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. त्या दोघांचाही चोकूने भोसकून खून केला होता. तसेच, घरातून सर्व दागिने आणि रोख रक्कमही चोरीला गेले होते.
पोपटाने सांगितले आरोपीचे नाव
शर्मा यांच्या घरात एक पाळीव पोपट आहे. मात्र खुनाच्या घटनेनंतर हा पोपट एकदमच शांत झाला होता. एके दिवशी महिलेचा पती विजय आणि मुलगी पोपटासमोर रडायला लागले आणि संतापून पोपटाला विचारले, ‘नीलमचा खून झाला आणि तू काहीच करू शकत नाहीस, नीलमला कोणी मारले ते सांग.’ यानंतर विजयने पोपटासमोर त्या सर्व लोकांची नावे घेतली, ज्यांच्यावर संशय होता. यावेळी भाच्चा आशूचे नाव घेताच पोपट जोरजोरात ओरडू लागला.
अंगावर कुत्र्याच्या चाव्याच्या खुणा
आशूचे नाव ऐकताच पोपट आशू-आशू ओरडायला लागला. आशूनेच नीलमची हत्या केल्याचा कुटुंबीयांचा संशय खरा ठरला. यानंतर विजय शर्माने याबाबत पोलिसांना सांगितले. पोलिसांनी आशुला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याच्या अंगावर कुत्र्याच्या चाव्याच्या खुणा आणि जखमा आढळल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपला मित्र रॉनी मेस्सीसह नीलम शर्माची हत्या केल्याची कबुली दिली.